बाबा किरमानीचा उद्या 28जाने उर्स आहे त्या निमित्ताने


.
सूफी संप्रदायाचा प्रसार ईसवी सन 1300 नंतर महाराष्ट्रत झाला असला तरी नवव्या शतका मध्ये इजिप्तचे रहिवाशी हजरत नूरुद्दीन हे भारतात आल्यावर औरंगाबाद जिल्यातील डोंणगाव येथे स्थायिक झाले त्यावरुन 1250 च्या पूर्वी पासून मुसलमान साधु-संत महाराष्ट्रात येऊन स्थायिक होत होते असे दिसते,
दिल्लीत वास्तव्य असलेल्या हजरत निजामुद्दीन अवलियांच्या प्रेरणेने त्यांचे शिष्य हजरत मुंतज्बोद्दीन जरजरीबख्श यानी इ.स. 1300 मध्य 700 साधु संत घेऊन महाराष्ट्रत येऊन वेरूळ जवळील खुलताबाद येथे मुक्काम केला,
त्यांचे शिष्य पैठन,वैजापुर गंगापुर,उस्मानाबाद, बीड येथे जाऊन सर्वसामान्य लोकांना एक ईश्ववर भक्तीचा मार्ग दाखवायचे, सदभाव,सहिष्णुता,उदारमतवाद,प्रेम,भाईचारा, बंधुभावावर जोर असायचा,ईश्वराचे नामस्मरण,सद्वर्तनावर जोर असायचा,समतेची वागणूक पाहून लोक प्रभावित होत,परोपकार,दया, करुणा या मानवतावादी मूल्या वर त्यांची अविचल निष्ठा असायची.
पण ऐन तारुण्यात ह.जर्जरीबक्ष रह.यांचा मृत्यू झाला,आज खुलताबादला त्यांची सर्वात जुनी,प्रचंड मोठी दरगाह आहे, पूर्ण शासकीय इतमामाने ह्याचा उरूस भरतो,संपूर्ण औरंगाबाद शहराला शासकिय सुट्टी असते,ह्यांच्या मृत्यूनंतर ह.निजामुद्दीन रह.या महान सोफी संतांनी आपले शिष्य व ह.जर्जरीबक्ष रह.यांचे वडील बंधू ह.गरीबशहा बुर्हानुद्दीन रह. यांना पुन्हा 700 सुफीसंतासह खुलताबादला पाठविले,हेच सुफीसंत व यांचे शिष्य गण आज महाराष्ट्रात जेवढ्या काही शहर असो की खेडी ज्या काही दरगाह तुम्हांला दिसतात ते सर्व जवळपास याच शिष्य परंपरेतले आहेत,हे नक्की
काही अपवाद असतील,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पश्चिम बाजूला ,चनई रोडला हजरत ख्वाजा मसूद किरमानी रह.यांची एतेहासिक,प्राचीन बहामनीकालीन दरगाह आहे,
ह.मसूद किरमानी रह.हे मूळचे अफगाणिस्तान मधले,ई.स. 1380 ला ते अंबाजोगाईला आले,इथेच त्यांनी आपले भक्तिमार्गचे कार्य केले,अंबानगरीतल्या या महान सुफी संताची दरगाह आज इथे आपल्याला पहायला मिळते.
हिजरी calandar प्रमाणे 16 रज्जबला दरवार्षि मोठया उत्साहात उरूस भरतो,हिंदू मुस्लिम जायरीन जियारतसाठी येतात,
निजामकाळात पूर्ण शासकीय इतमामाने संदल Adv. मौलवी मीर गझनफर अली उस्मानी साहेब यांच्या घरापासून निघायचा,शासकीय प्रतिनिधी म्हणून डेप्युटी कलेक्टर आपल्या डोक्यावर चादर घेऊन दर्ग्यात जात,जेव्हा संदल आजच्या सरकारी srtr वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय असलेल्या तैनाती फौजेच्या लष्कराच्या छावणीतून जायचा तेव्हा तोफांची सलामी दिली जायची,पुढे 3,4 दिवस उरूस चालायचा,
संपूर्ण तालुक्यातील 200 खेड्यातील लोक या उरूसाला आपापल्या बैलगाडीने येत असत,दरगाह समोरील सर्व मैदानावर गजबजलेल्या दुकानात लोक खरिदी करायचे,मिठाईचे दुकान असायची,
विविध प्रकारची खेळ व्हायचे , कोंबड्याच्या झुंजी,बैलांच्या व रेड्याच्या टकरी चालायच्या, गारुडी,मांगगारुडी,नागवाले,माकडवाले,असवलवाले,डोंबारी आपआपले खेळ दाखवायचे, हा उरूस 3,4 दिवस चालायचा,
ही दरगाह ऊंच अश्या टेकडीवर बनवलेली आहे,गोल टेकडीला चहू बाजूने भक्कम किल्ल्याच्या तटबंदी सारखी अभेद्य भिंत आहे,चारी बाजूला मजबूत बुरुज आहेत, दरगाह च्या परिसरात अत्यंत जुनी अशी कबरी आपल्याला पाहायला मिळतात,दगडी, नक्षीदार काम केलेले हे मकबरे आहेत,ह्या दरगाहचे आपण जर बारकाईने निरीक्षण केले तर या दरगाह चे बांधकाम दोन टप्प्यात पूर्ण झालेले आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि दोन्ही बांधकामा मध्ये काही शतकांचा फरक पण दिसून येतो,
मुख्य गाभागृहचे काम व त्याला चिटकूनच असलेल्या कबरी वर 14 व्या शतकात झालेले दगडी काम हे अत्यंत सुबक,कोरीव पाषाणात केलेले दिसून येते, मजारची जागा,त्याच्या समोरील जायरीनची बसायची जागा तसेच मजारच्या उजव्या बाजूला असलेलं मुसफिर खाना व कोरीव दगडाच्या कबरी हे बहामनी कालीन 15 व्या शतकातील आहेत हे स्पष्टपणे दिसतं,तर नंतर निजाम काळात झालेल्या बांधकामात दगड ,वीट, चुना याचा वापर दिसून येतो,बाहेरील मुख्य कमान ही निजामकालीन आहे,ही प्रेक्षणीय कमान दरगाह च मुख्य प्रवेशद्वार आहे,बाजूला वर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची व्यवस्था आहे,वर 10 माणसं बसतील एवढी प्रशस्त जागा आहे,वर दगडी छत आहे,छतावर 4 गुम्मद आहेत,या वरच्या खोलीत बसून चोहू बाजूचे निरीक्षण करता येते,पूर्ण अंबाजोगाई दर्शन तुम्हांला येथून घेता येईल पार रविवारपेठ च्या इदगाह पर्यंत,मी त्याचे फोटो खाली दिलेले आहे
दर्ग्यात येणाऱ्या जायरीन साठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दरगाह परिसरात दगडी बांधकाम केलेली सुंदर कोरीव दगडाची विहीर आहे,पाणी घेता यावे म्हणून विहीर मध्ये उतरण्यासाठी पायऱ्याची सोय केलेली आहे,ही विहीर हिजरी 1200 म्हणजे इ.स.1780 ला बांधलेली आहे,विहिरी मध्ये दक्षिणेकडे असलेल्या दगडी भिंतीवर वरच्या बाजूला कुतबा(दगड) लावलेला आहे फारसी मध्ये या विहिरीची माहिती दिलेली आहे, अंबाजोगाईवर त्या वेळेस निज़ाम - उल - मुल्क, आसफ जाह दुसरे,
मीर निजाम अली खान ( जन्म:-मार्च ७ इ.स. १७३४ )
( राज्य केले ,जुलै ८ इ.स. १७६२ – ऑगस्ट ६ इ.स. १८०३) यांचे राज्य होते,
विहिरीवर असलेल्या नेमप्लेट वर विहीर बाधणार्याचे नाव व कधी बांधली हे दिलेले आहे,चित्रात हा फोटो आहे,आज सुद्धा विहिरीत पाणी दिसून येते,
निजाम काळाचे एक वैशिष्ट्य हे पण दिसून येते की सार्वजनिक जागेच्या ठिकाणी जिथे गर्दी जमा होत असे अश्या स्थळी हमखास डेरेदार वडाचे झाडे दिसून येतात, इथे पण आपल्याला विहिरीच्या बाजूला मोठे वडाचे झाड दिसून येते,
दर्गा मध्ये मुख्य कमानीला चिटकून सामोरा समोर दोन दोन मकबरे आहेत,हे मकबरे वर अत्यंत सुबक,कोरीव नक्षीकाम केलेले आहे,माध्यभागी कबर असली तरी आजूबाजू ज्या पांढऱ्या रंगाच्या भिंती आहेत,ते पाहण्यासारखे आहे,वर छत व गुम्मद मोघल कालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे,बारकाईने बघितल्याशिवाय हे नक्षीकाम सहज लक्षात येत नाही,मुख्य मजारच्या उजव्या बाजूला 14 व्या शतकातील पुर्णतः दगडी बांधकाम केलेल्या कबरी आहेत,विटांचा कुठेच उपयोग झालेला दिसत नाही बहुतेक त्या कबरी किरमानी बाबांच्या जवळच्या लोकांच्या असाव्यात,
मला जर तुम्ही विचारलं की इथलं सर्वात जास्त आवडलेली जागा कोणती तर माझं उत्तर राहील या दगडी कबरी च्या बाजूला असलेला टुमदार,संपूर्ण दगडी मुसफिरखाना,अत्यंत देखणी ही जागा,दरगाहची बारकाईने निरीक्षण करत असताना ,कब्रस्तानात ही वीट निखळून पडलेली आम्हांला सापडली ,मकबर्यात व कमानीत विटेचा उपयोग दिसून येतो,
निजाम काळात या विटेचा बांधकामात वापर दिसून येतो,त्या काळातील वीट ही जाड नाही,पसरट आहे,त्यावर चुन्याचा थर दिसतोय,चित्रात विटांची फोटो दिलेली आहे ह्या दर्ग्याची सेवा,देखरेख चांगल्या प्रकारे व्हावी,फातेहासाठी येणाऱ्या जायरीनची सोय चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून निजाम कालीन नवाब,नवाब शरफुदौला यांनी इ.स.1760 ला या दर्ग्याच्या सेवेकऱयाना 40 एकर जमीन खिदमते माश (सेवा-हितार्थ साह्य) म्हणून दिली,ह्याची फारसी लिखित कागदपत्रे ह्या लोकांच्या वंशजांजवळ आज सुध्दा दिसून येतात.मध्य युगीन मराठवाड्यात अनेक सुफी संतांनी मोलाचे कार्य केलेले आढळते,परंड्यात ह.ताजुद्दीन बाबा रह.,उस्मानाबाद चे गाझी शंमशुद्दीन रह.,कंधारचे बाबा सुलतान सांडगे रह.,पैठणचे निजामुद्दीन रह.,व मौलाना साहेब रह.,औरंगाबाद चे निजामुद्दीन रह.,शहानुर रह. व शाह मुसफिर रह.,दौलताबाद जवळील जलालूद्दीन रह.,व मोमीन आरिफ रह.बीडला शहेनशाह वली रह.तर केज ला काझी मोहजीबोद्दीन रह. हे ऐतिहासिक सोफीसंत येऊन स्थायिक झाले.
खुलदाबादचे ह.जैनुद्दीन,ह्यांना औरंगजेब खूप मानायचे,दोघांच्या जन्मात 250 वर्षाचे अंतर,तुम्हाला माहीत नसेल,औरंगजेब हे अहमदनगर येथे 3 मार्च 1707 ला वारले,त्यांच्या अंतिम इच्छे प्रमाणे या महान सम्राटाला नगर मार्गे येथे आणून ह.जैनुद्दीन रह.यांच्या पायापाशी दफन केलं गेलं,आज सुध्दा औरंगजेबांची अत्यंत साधी कबर खुलदाबादला आहे,
अगोदर ही कबर अत्यंत साधी मातीची होती पण नंतर निजाम काळात,निजाम सरकारच्या वतीने त्याच्यावर संगमरमर फरशी बसविण्यात आली.
बाबा किरमानी असो की वरील सर्व सोफीसंत हे सर्व शहराबाहेर रहायचे, कर्मठपणा ला यांच्या जवळ थारा नसायचा,एका ईश्वराची आराधना करावी,परस्पराशी स्नेहाने वागावे,सर्व सुफीसंत वैराग्य,तपश्चर्या व मानवतावादा चे उपासक होते,त्यामुळे ह्यांनी मुस्लिमा प्रमाणे बिगर मुस्लिमांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली,ह्यांच्या शिकवणुकी मुळे सर्व समाजात सदभाव, सहिष्णुता,सहचर्य निर्माण झाले होते,
आज गरज आहे दरगाह परिसर स्वच्छ, सुंदर,हिरवेगार करून पर्यटकांना आकर्षित करून शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा,ह्या विषयी सर्वच पातळीवर प्रचंड उदासीनता दिसून येते,
City Of Secularism,अंबाजोगाई, या नगरी मध्ये प्राचीन हिंदू मंदिर आहे, जैन,बौद्ध कालीन लेण्या आहेत,निजामकालीन इस्लामिक स्थळे आहेत,
सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने शहरात रहात आहेत,हे या शहराला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी गोष्ट आहे,आणि पुढे भविष्यात पण तिने वृध्दिंगत व्हावे ही सर्वशक्तिमान अल्लाहला प्रार्थना ।।
मुजीब हमीद काजी
8087562875
अंबाजोगाई