धर्मनगरीचे सुसंस्कृत रामशास्त्री तथा आधारवड परमेश्वरदादा...

Sampadkiya

.

प्राचिन, अप्रतिम व ऐतिहासिक शिल्पकलांनी समृध्द धर्मापुरीबद्दल पुस्तकांत, लेखांत व सोशल मिडीयात संदर्भप्रचुर वाचनीय माहिती आहे. याच धर्मनगरीत आदमासे पन्नास (50) वर्षापुर्वी समाजसेवेचा सर्वोत्तम वारसा जपताना ज्यांनी वंचित उपेक्षितांना आधार दिला अशा कर्मयोग्यावर भाष्य करण्याचा मनोदय होता. फेसबुकवर नव्याने जॉईन झाल्यावर एके दिवशी परमेश्वरदादा फेसबुक वॉलवर दिसले आणि असंख्य आठवणी उचंबळुन आल्या, सोबतच या वयातही दादा फेसबुकवर आहेत याचे कुतुहलही वाटले. 
       
        वस्तुत: गत 35 वर्षापासुन परमेश्वरदादांची स्नेहभेट नाही की हितगुज नाही पण चार दशकापुर्वीच्या पुसट आठवणी स्मृतीपटलावर बिंबीत आहेत. सरासरी पंचेचाळीस-पन्नास वर्षापुर्वी धर्मापुरी ग्रामपंचायत प्रमुख परमेश्वरदादांचा अंधुक प्रवासपट डोळ्यासमोर येतो. नक्की "लांबनदिवा" की आणखी काय नांव आठवत नाही, पण पन्नास वर्षापुर्वी परमेश्वरदादाच्या काळात आकाशकंदिलासारखे पथदिवे होते, हे मात्र आठवते. सुसंस्कृत, सात्विक व समंजस व्यक्तिमत्व असणारे परमेश्वरदादा हे धर्मापुरीतील पहिले बुलेटधारक. परमेश्वरदादा मुत्सदी, धोरणी व दुरदृष्टीचे असल्याने त्यांचेकडुन रागावल्याचा, आक्रमक झाल्याचा किंवा कावेबाजपणाचा अनुभव कोणीही घेतला नाही. 

        पांढरा शुभ्र कमीज़-धोतर, गोरेपान राजिबींडे व आकर्षक व्यक्तिमत्व, तत्वाला बांधिल असणारे राजकारणी, नेतृत्वाला शोभेल असे वर्तन व भाषा यामुळे जुन्या पिढीत लोकप्रिय लोकनेता म्हणुन परमेश्वरदादांचे समाजकारण प्रभावी होते. आज विविध योजनांद्वारे लक्षावधी रुपयांचा निधी मिळत असल्याने विकासकामे सहज शक्य आहेत. पण प्रतिकुल परिस्थिती, निधीचा अभाव व मर्यादित भौतिक सुविधा असताना परमेश्वरदादांनी गावाचा केलेला कायापालट गावकऱ्यांच्या अजुनही लक्षात आहे, हे विशेष. नेमके एक का दोन टर्म आठवत नाही पण सरपंच म्हणुन त्याकाळी परमेश्वरदादांनी केलेली वंचित-उपेक्षितांच्या सेवेची चर्चा पाच दशकांपासुन अव्याहत सुरु आहे. विद्यमान नेतृत्वाने गावाचा केलेला अद्भुत, नेत्रदिपक व लक्षवेधी विकास तर माईलस्टोन ठरतोय, ही बाबसुध्दा दखलपात्र आहेच. गावातील आधावडांवर भाष्य करताना अर्थात अनेक ज्ञात-अज्ञातांनी धर्मापुरीच्या मातीची मनोभावे सेवा केलीच असेल, मला माहित असलेले सर्वचर्चित चेहरा म्हणुन परमेश्वरदादांच्या प्रवासासह कार्यावर प्रकाश टाकतोय. विशेष म्हणजे परमेश्वरदादा शेजारी असल्याने त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आम्ही नखशिखांत ओळखतो. 

               परमेश्वरदादांच्या मालिकेत अध्यात्माच्या माध्यमातुन धर्मापुरीला प्रतिष्ठा मिळवुन देणारे विठ्ठल महाराजांबद्दल सर्वधर्मीयांना आदर होता. विवंचना असणाऱ्या गरीबांना लग्नाचा बस्ता, किराना व आर्थिक मदत करणारे आणि चार-पाच घरे असताना धोंडीराम काका सरपंच होवुन गावगाडा हाकताना आपण पाहिले आहेत. पंढरपुर, शनिशिंगणापुर किंवा माहुर यात्रांना जावु इच्छिणाऱ्या धर्मापुरीकरांना आर्थिक मदत किंबहुना सोबत राहुन खिशातील शेवटचा पै खर्च करणारे महादेवअप्पा दामा अनेक वर्षे गावचे प्रमुख होते. गावातील न्यायनिवाडा करण्यात, रज़ाकारांच्या काळात बांधवांना आश्रय देणारे, रुबाब व दरारा असणारे खुशालरावबाबा आजही आठवणीत आहेत. चाळीस पन्नास वर्षापुर्वी जमिनी भरपुर होत्या, पण उत्पन्न जेमतेम. अशाकाळात गरजवंतांना आर्थिक मदतीसह सवयीने ज्वारी देणारे दसराबाबा. धोंडीरामकाका व महादुअप्पा दामा यांच्या खांद्याला खांदा लावुन काम करणारे नागेशबाबा क्षिरसागरांनी त्याकाळात अनेकांना भरीव मदत केलीय. 

           ज्यांच्या एका ओळीच्या चिठ्ठीवर मी अंबाजोगाईला विजयकुमार जाजुच्या घराकडील समाजकल्याण वस्तीगृहात किमान तीन वर्षे जेवलो, असे बहिराटाचे ज्ञानोबादादा (माऊली) आठवतात. धर्मापुरीचे वैभव, धर्मराजे व आधारवड म्हणुन परंपरा चालवणाऱ्यांत रोकडोबाबा, विनायकराव दादा, भानुदासबाबा, अजगरभाई, दत्तरावदादा घोबाळे यांच्यासह अनेक मानकरी आहेत. वितुष्ट, वैर, मतभेद, वाटण्या किंवा भांडणे यांत रामशास्त्र्यासारखी भुमिका बजावणारे सर्व देवस्वरुप देवमाणसं प्रत्येकाच्या स्मरणांत राहतील. आता माणसं बदलत आहेत, राजकारण-समाजकारण बदलतेय आणि काळसुध्दा बदलतोय, पण गावगाड्यातला सर्वोपयोगी माणुस म्हणुन धर्मापुरीच्या मातीची इमानइतबारे लोकसेवा करणारे परमेश्वरदादांसह "वर उल्लेखित सर्व आधारवड" सर्वांसाठी सर्वकालिक श्रध्देय आहेत. अर्थात व्यक्तनिष्ठा व कार्यपध्दतीमुळे प्रत्येकाची मतमतांतरे असतील, पण ज्या धर्मराजांनी तद्वतच आधारवडांनी धर्मापुरी उभी करण्याचं काम केलय, त्यांच्याप्रती कृतज्ञतेसह आदर व्यक्त करणे हे आपले परमकर्तव्य आहे.

                   दि.ना.फड,