"सिताफळ" हे बीड जिल्ह्याचे वैभव असलेला रानमेवा आहे.

Shet Shivar

.

                      अंबाजोगाई (प्रतिनिधी )-  

       जगभरात नावाजलेली चव, गोडी यामुळे याला जागतिक मानांकन प्राप्त (जी.आय.टॅग) आहे. आता सिताफळाची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तेव्हा याची निर्यात करून शेतकऱ्यांना नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो. त्यासाठी आवश्यक "उत्तम कृषी पद्धती सिताफळ" म्हणजे "ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन" बाबतचे प्रशिक्षण "मॅग्नेट" प्रकल्पाअंतर्गत "मानवलोक सेंटर ऑफ एक्सलन्स" द्वारे . २३ जानेवारी २०२४ (मंगळवार) रोजी मानवलोक मुख्यालय अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले होते.

                 अनेक शेतकऱ्यांचे सिताफळ लाऊन ३-४ वर्षांहून अधिक झालीत, बाग धरला पण यावर्षी बरीच अळी निघाली, पावसाच्या गोंधळामुळे निट बहार धरता आला नाही, भाव आला तेंव्हा माल नव्हता माल लागला तेंव्हा भाव कमी झाले, सिताफळ बागेत एकावेळी गाडीभर माल निघत नाही, निघालेले ५/१० किंवा १०/२० क्रेट चांगला भाव मिळणाऱ्या बाजारात घेऊन जायला वाहतुकीला परवडत नाही, लोकलला व्यापारी भाव अडवून कमी करतात. छाटणी नक्की कधी करावी? बहार कधी धरावा म्हणजे जास्त भाव असण्याच्या काळात फळ पक्व होऊ शकेल? बहार धरताना पिकाला आवश्यक खत-पाणी कधी, किती, कसे द्यावे? फळमाशीचा त्रास कसा नियंत्रणात ठेवावा? सीताफळाच्या सालीवर कला डाग पडू नये म्हणून काय करावं? देठ काळ करणारा रोग कसा नियंत्रणात आणावा ? सीताफळ हंगाम सुरु होण्याच्या सुरुवातीला आणि शेवटी फळांना चांगला भाव मिळतो, बऱ्याच शेतकऱ्यांचा माल मार्केटला आला कि भाव खाली पडतो, नेमकं माल कधी बाजारात आल्यास भाव चांगला मिळण्याची शक्यता अधिक आहे? भाव अधिक असताना माल काढण्यासाठी छाटणी कधी करावी? बागेचे व्यवस्थापन कसे करावे?  या प्रश्नांची उत्तरे मिळवणयासाठी आणि पुढच्या वर्षीचे नुकसान टाळण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

         संस्थेचे सह कार्यवाह श्री. लालासाहेब आगळे यांनी प्रास्ताविक केले तर यात प्रमुख पाहुणे म्हणून पणन विभाग लातूर आणि मॅग्नेट पी आय यु चे उप व्यवस्थापक श्री. बरडे  उपस्थित होते. त्यांनी सहभागी शेतकऱ्यांना मॅग्नेट प्रकल्पांतर्गत विविध योजनांची माहिती दिली.  

            सीताफळ बागायतदार संघाचे  रमेश निकस यांनी गटाने एकत्रित मार्केटिंग कशी करता येईल या बाबत मार्गदर्शन केले. अनुभवी शेतकरी श्री. गणेश गायकवाड यांनी बहार व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. शिनगारे  यांनी बीडच्या बालानगर सीताफळाला मिळालेल्या जागतिक मानांकनाचे मार्केटिंग मधील महत्व या बाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. वडखेलकर यांनी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची तपशीलवार माहिती दिली. कृषी विभाग प्रमुख इरफान शेख यांनी मानवलोक मार्फत सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच उत्तम कृषी पद्धती सिताफळ बाबत मार्गदर्शन केले. मॅग्नेटचे प्रकल्प अधिकारी यांनी महिलांचे शेतीतील महत्व व लिंग समभाव बाबत मार्गदर्शन केले.परिसरातील सीताफळ उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने प्रशिक्षणात सहभागी होते.