नागझरी फिडरमधून शहरी आणि ग्रामीण भागाचे विभाजन करण्यात आले


.
सतत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या जाचातून अंबाजोगाईकरांची सुटका होणार
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे हवालदिल झालेल्या अंबाजोगाईकरांना दिलासा देणारी खबर आहे. शहरालागत असलेल्या मांडवा सब-स्टेशनच्या नागझरी फिडर मधून आता शहरी आणि ग्रामीण भाग वेगवेगळा करण्यात आल्याने वीजपुरवठ्या अभावी होणाऱ्या जाचातून अंबाजोगाईतील नागरिकांची सुटका होणार आहे. आ. नमिता मुंदडा यांनी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना मंजूर करून काम सुरु करून घेतले होते. ते काम पूर्णत्वास जाऊन रविवारी याचा शुभारंभ करण्यात आला.
अंबाजोगाई लगतच्या मांडवा सबस्टेशन मधून पाच फिडरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. यातील नागझरी फिडरवर अंबाजोगाई शहराचा निम्मा आणि लगतच्या पाच खेड्यांचा लोड आहे. या फिडरवर तब्बल ९५ रोहित्र असून त्याच्या ११ केव्ही वाहिन्या दूर दूर पर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होत असल्याने किंवा कुठेही दुरुस्तीचे काम सुरु असले कि अनेकदा फिडर बंद करावे लागत होते. परिणामी, सतत विद्युत पुरवठा बंद होत असल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी हवालदिल झाले होते. ओव्हरलोडमुळे वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर देखील ताण येत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या मार्फत नागझरी फिडरवरील शहरी आणि ग्रामीण भाग वेगवेगळा करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला.
पहिल्याचा अधिवेशनात मांडला होता प्रश्न
आ. नमिता मुंदडा यांनी आमदारकीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनातच हा प्रश्न सभागृहात मांडला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि या कामासाठी एजी स्कीम व आमदार फंडातून ३५ लाख रुपये मंजूर झाल्यानंतर गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात लोड विभागणीचे काम सुरु झाले. हे काम आता पूर्णत्वास गेले असून जुन्या फिडरवर अंबाजोगाई शहराचा लोड कायम ठेवण्यात आला आहे तर नवीन फिडरवर ग्रामीण भागाचा लोड टाकण्यात आला आहे. रविवारी (दि.२१) आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते नवीन यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला.
असा होणार बदल
नागझरी फिडरमधून शहरी आणि ग्रामीण वेगळा करण्यात आल्याने ओव्हरलोडिंगचा प्रश्न उद्भवणार नाही, त्यामुळे अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होईल. फक्त शहरी भागात काही अडचण उद्भवली तरच आणि तेवढ्याच भागाची वीज बंद करण्यात येईल, अन्य ठिकाणी मात्र वीज पुरवठा सुरु ठेवता येईल.
मुलभूत सुविधांसाठी प्रयत्नशील
चांगले रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी माझे प्राधान्य आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी सर्वत्र वेगाने कामे सुरु आहेत. तसेच, पठाण मांडवा गावासाठी स्वतंत्र फिडर देऊन परळी ऐवजी मांडवा सब स्टेशनमधून वीज पुरवठा करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
- आ. नमिता मुंदडा