मुसलमानाच्या वटीत गेलेल आम्ही लेकुळे आणि तीन प्राचार्य...

.
गतकाळात सहकारी मित्र फेरोजच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात "वयोवृध्द अम्मीच्या मांडीवर डोके ठेवुन मातृवत्सलतेचा अनुभव" घेतला आणि तीन दशकापुर्वीच्या संस्मरणीय आठवणी उचंबळुन आल्या. कोणताच धर्म खराब नसतो तद्वतच धर्मांध माणसं मात्र खराब असतात, हे सर्वश्रुत व सर्वज्ञात आहे. सर्वत्र धर्माच्या नावाने नकोशी अराजकता माजल्याने धर्मावर भाष्य करणे निरर्थक ठरते. गंगा-ज़मना तहज़िब, धार्मिक सोहार्द व भाईचाऱ्याचे अनेकानेक अनुभव प्रत्येकाच्या पदरी आहेत. त्याच मालिकेतील स्वानुभवावर हे शब्दांकन.
अर्थात कौटुंबिक, वैयक्तिक व हळुवार आठवणी असल्याने यातुन कोणाचे "उगीचच उदात्तीकरण" करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. चौतीस वर्षापुर्वी अठराविश्व दारिद्र्यातुन शिक्षण घेत असताना माझा "स्वभाव" बरा वाटल्याने नजिमभैय्याने माझ्या घरी रहायला येतोस का ? विचारल्यानंतर आमचे बस्तान अंबाजोगाईच्या गुरुवार पेठेतील "इसाक मंझ़िल" मधील पहिल्या मजल्यावरील सिंगल रुममध्ये शिफ्ट झाले. मीच गरीब, मला आणखी एक गरीब अरुण भेटला तेंव्हा भैय्याला म्हणालो, "याला पण सोबत ठेवुन घेवु या." मग अरुण पण आला. भैय्याचे वडील म.इसाकोद्दीन सैन्यातुन रिटायर झालेले मेजर होते, आई गृहीणी, भाऊ जर्दाचा दुकानदार तर बाज़ी विवाहित. अशा कुटुंबाचे आम्ही "कुटुंबीय" झालो. लोकभाषेत वटीत जाणे म्हणजे दत्तक घेणे असा अर्थ असला तरी लोकभाषेतच लेकुळे या शब्दाचा अर्थ "दानशुरावर आश्रित किंवा आधाराने जगणारा" असा अर्थ आहे. अरुण व मी गरजवंत असल्याने आणि जात-धर्माच्या परिभाषेपासुन दुर असल्याने निसंकोच आम्ही मुसलमानाच्या वटीत गेलेले लेकुळे झालो होतो. नाही तरी "गरीबीला" धर्म नसतो फक्त गरज व पोट असते, हे सर्वमान्य असेल. त्या काळातील असंख्य संस्मरणीय आठवणी व घटनाक्रमांचे आम्ही साक्षिदार झालो आहोत. नजिमभैय्याच्या घरात दोन चाचे, दोन चाच्या आणि कित्येक भावंडे वास्तव्याला होती. सर्वांशी आमचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे नाते. नि:संशय या परिवाराच्या सस्नेह सहवासामुळेच "आमची उर्दु व हिंदी" परफेक्ट झाली, हे सविनय नमुद करावे लागेल. आम्ही जेवायचो समाजकल्याणच्या वसतीगृहात पण नजिमभैय्याच्या घरी राहताना रमज़ान महिन्यात आम्ही पक्वान्नावर ताव मारायचा, सर्व सण-उत्सवात सहभाग नोंदवायचा, पंचमी-दिवाळीला जसे बहिणीला आणतात तसे अरुण उदगीरहुन बाज़ीला आणायच, उदगीरच्या भईमियाँशी मैत्रिपुर्ण संबंध, सायगावला उरुसात जायचं. नज़िमभैय्या "व्यायाम, खाणे आणि झोपणे" यांत माहिर होता. पण ननचक्कु चालवणे व कराटेचे कांही फंडे आम्ही त्यांच्याकडुनच शिकलो. मराठवाडा महाविद्यालयातील सर्व उपक्रमात तर आमचा उस्फुर्त सहभाग असायचा. आम्ही तीघेही NCC मध्ये होतो. SFI च्या मोर्च्यात आम्ही तीघेही मुंबईला गेलो होतो, त्यावेळी मनमाडला मोर्चेकऱ्यांत व सिज़न पासधारकांत तुफान राडा झाला होता. नज़िमभैय्याने चतुराईने SFI चा बॅच खिशात ठेवला आणि सिज़न पासधारकासोबत मोर्चेकऱ्यांनाच हाणले होते. भैय्याच्या सायकलीवर कॉलेजला जाताना त्याने आम्हाला "कायम सायकलरिक्षावाला" बनवले होते. कॉलेज जीवनात अल्टर करुन वापरलेले सर्व कपडे नजिमभैय्याचे होते, हे पण निसंकोच नमुद करायला हरकत नाही. प्रेम, जिव्हाळा व नात्यांची वीण यामुळे नज़िमभैय्याचे डॅडी, अम्मी, बाज़ी व भैय्या आमचे पण अंतकरणातुन डॅडी, अम्मी, बाज़ी व भैय्या झाले होते. डॅडी कमालीचे देशप्रेमी आणि कडक होते तर अम्मी मात्र फार मयाळु होती. अम्मी खुप गोड, प्रेमाने व हळुवार बोलायची. पुढे नज़िमभैय्याच्या "अभ्यासामुळे (?)" मी निरोप घेतला पण अरुण लग्न होईपर्यंत नज़िमभैय्याकडेच राहिला. सोयरिक जमवण्यापासुन ते लग्न होईपर्यंत आणि नव्या नवरीच्या येती-जाती पासुन ते अरुण घर घेईपर्यंत अरुण नज़िमभैय्याच्या घरीच राहिला होता. MIT येथिल अरुणच्या लग्नात आम्हा मित्रांसह "बाराने" वऱ्हाडी मुसलमानाचे बघुन नवरीचे माजी आमदार असणारे मामा आम्हाला म्हणाले होते, "पोरं हो, बिऱ्हाड अस्सं कस्सं रं ?" तेंव्हा मी म्हणालो होतो, "अरुणला मुसलमानांनी वटीत घेतलय, म्हणुन हे अस्संच हाय, अक्षदा पडायच्या अगोदरच सांगा, पटतय का ते ?" पुढे एकदा एका लग्नात पडद्याआड बसलेल्या अम्मीच्या मी पाया पडलो तेंव्हा, "अल्ला अल्ला यह लडका क्या कर रहा है ?" असा दोन-तीन महिलांचा आवाज आल्यानंतर मी सांगितलं, "आमच्यात आईचं ऋण अस्संच व्यक्त करतात." रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती सर्वश्रेष्ठ ठरतात हा आम्ही साक्षात अनुभव घेतला आहे. नज़िमभैय्याच्या "कुटुंबाच्या" आधाराने आयुष्याची वाटचाल यशस्वी झालीय. आम्ही तीघे क्लासमेट, रुममेट, ताटमेट व अंथरुन-पांघरुनमेट आज आपापल्या शैक्षणिक संकुलाचे "प्राचार्य" आहोत. नज़िमभैय्या, डॅडी, अम्मी व जाफरभैय्यासाठी आमच्या हृदयाचा एक कोपरा कायम आरक्षित असेल. आम्ही अगोदर "इन्सान" आहोत आणि नंतर "धर्माचे" म्हणुन आजही आमच्या नात्यात अंतर पडलेले नाही. मिठाला जागावे असा संकेत असल्यामुळे नव्हे तर प्रतिकुल परिस्थितीत आम्हाला वटीत घेवुन कौटुंबिक प्रेम दिल्याबद्दल आम्ही नज़िमभैय्याच्या परिवाराचे सदैव ऋणाईत आहोत...
9421989076