स्वनिधी आणि दीनदयाळ अंत्योदय योजनेतील प्रलंबित कर्ज प्रकरणांचा आ. नमिता मुंदडांनी घेतला आढावा

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )- अंबाजोगाई नगर परिषद व केज नगर पंचायत अंतर्गत शहरातील फेरीवाल्यासाठी सुरु असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना" व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठीची "दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान" अंतर्गतच्या लाभार्थीचे बँकेकडील प्रलंबित कर्ज प्रस्तावाचा केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बँकनिहाय सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी गरजूंच्या प्रस्तावांवर सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांना वेळेत अर्थसहाय्य देण्याच्या बँक अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना या दोन्ही योजनांची केज मतदार संघात प्रभावी अंमलबजवणी करण्यासाठी आ. नमिता मुंदडा प्रयत्नशील आहेत. मात्र, काही किरकोळ अडचणी अभावी अनेक गरजवंतांचे कर्जप्रस्ताव प्रलंबित आहेत. यातील नेमक्या अडचणी आणि त्यावर उपाय काढण्याच्या हेतूने बुधवारी (दि.०३) रोजी आ. मुंदडा यांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि अंबाजोगाई, केज शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची आढावा बैठक घेतली. यावेळी आ. मुंदडा यांनी दोन्ही योजनेच्या प्राप्त अर्जानुसार बँक निहाय आढावा घेतला. या दोन्हीही योजना शहरातील गरीब कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्यांच्या कर्ज प्रस्तावाबाबत बँक अधिकार्यांनी सकारात्मक विचार करून त्यांना वेळेत अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे व शासनाने दिलेले उदिष्ट येत्या 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करावे अशा सूचना आ. मुंदडा यांनी यावेळी केल्या.
या बैठकीस तहसीलदार विलास तरंगे, मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, नायव तहसीलदार सचिन देशपांडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजेंदू झा, तहसील कार्यालयाचे गायकवाड, न. प. कार्यालयीन अधीक्षक सय्यद अन्वर, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे, शहर अभियान व्यवस्थापक सामिरोद्दिन शेख, न.प केज सहा. प्रकल्प अधिकारी श्रुती भुसारी तसेच अंबाजोगाई व केज शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा व्यवस्थापक इ. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ. गुट्टे यांनी केले. तर, तहसीलदार तरंगे यांनी आ. मुंदडा यांनी यांनी सूचित केल्याप्रमाणे सर्व बँकांनी येत्या 15 दिवसात उदिष्ट पूर्तते बाबतचा अहवाल तहसील कार्यालय व नगर परिषद येथे सादर करावा अशा सूचना केल्या.