वृक्षमित्र सुधाकर देशमुख शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित; सर्वस्तरातून अभिनंदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना पुणे येथील यशदा येथे राज्याचे वने सांस्कृतिक कार्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे येथील यशदा येथे (दि.२६) मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्मृती चिन्ह,सन्मान पञ आणि पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश असं पुरस्काराचे स्वरुप होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना.चंद्रकात (दादा)पाटील (मंञी उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण,वसञोउदयोग आणि संसदीय कार्य तथा पालक मंञी, पुणे ), बी.वेणुगोपाल रेड्डी (सचिव वने महसूल व वनविभाग, मंञालय मुंबई), वाय.एल. राव. प्रधान ( मुख्य वन संरक्षक, वनबल प्रमुख, महाराष्ट्र राज्य.नागपूर), डॉ.सुनिता सिंग.प्रधान ( मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण ,महाराष्ट्र राज्य पुणे), विवेक खांडेकर ( अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक मुख्यालय सामाजिक वनीकरण ,महाराष्ट्र राज्य पुणे ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुधाकर देशमुख हे अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर येथील रहिवासी आहेत. मागील ४१ वर्षांपासून देशमुख वृक्षारोपण,संवर्धन,बीज संगोपन आणि जनजागृतीचे काम करत आहेत. त्यांच्याकडे मोफत रोपवाटिका असून विविध समारंभात ते रोपे भेट देतात. याच कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वृक्षमित्र देशमुख यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.