शेतकऱ्यांना गंडावणारा भामटा केज मधून पोलिसांनी घेतला ताब्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केज आणि परंडा पोलिसांची कारवाई



गौतम बचुटे/केज :- प्रधानमंत्री किसान योजनेतील लाखो रु परस्पर उचलून शेतकऱ्यांना फसविणार ठक परंडा पोलिसांनी केज पोलीसांच्या मदतीने अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन त्याच्या कडून १८ लाख रु. हस्तगत केले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, परंडा तालुक्यातील प्रधान मंत्री किसान योजनेतील शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या खात्यावरील लाखो रु. परस्पर उचलून फसवणूक केल्या प्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा पोलीस ठाण्यात अजय दत्तात्रय चौरे याच्या विरुद्ध दि. ११ मार्च रोजी गु. र. नं. ७५/२०२३ भा. दं. वि. ४२०, ४७१, ४७२ यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. परंतु गुन्हेगार हा अत्यंत चलाख असल्या कारणाने त्याला माहिती मिळताच तो खाजगी वाहनाने परभणीकडे जात असल्याची पोलीस पथकाला माहिती मिळाली. खात्रीशीर माहिती मिळताच उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे कळविले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तात्काळ ही माहिती केज पोलीस ठाण्याचे डी बी पथकाला देऊन परंडा पोलीस पथकाला मदत करण्याचे आदेश दिले.
दरम्यान अजय चौरे हा दि. १२ मार्च रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास केज येथील वकील वाडीतील घरी आल्याची माहिती डी बी पथकाला मिळाली. परंडा पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे आणि त्यांचे सहकारी व केज पोलीस ठाण्याचे डी बी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक, दिलीप गित्ते, शमीम पाशा यांनी झडप घालून आरोपी अजय चौरे याला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे नगदी १८ लाख रु. ताब्यात घेतले.
या प्रकरणी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुसळे, केज पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते, शमीम पाशा यांनी करचाई केली.
आरोपीला न्यायालयाने १६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.