आईच्या मृत्यूनंतर धार्मिक रूढीला बगल देऊन शेतकऱ्यांच्या 11 मुलींना आर्थिक मदतीचा निर्णय

शेतकरी संघटनेचे पाईक सुभाष आबा मायकर, माऊली दादा मायकर आणि दिंद्रुड कृषक सहकारी संस्थेचे चेअरमन कुंडलिक बापू मायकर यांच्या मातोश्री सौ.कृष्णाबाई रोहिदास मायकर यांचे 7 मार्च 2023 रोजी निधन झाले.सकाळी 11 वाजता पिंपळगाव नाकले ता.माजलगांव जि.बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पारंपारिक धार्मिक रूढीला बगल देऊन 5 दिवसाचा दुखवटा पाळण्याचे मायकर कुटुंबाने जाहीर केले.रक्षा विसर्जनाच्या दिवशी तिन्ही भावांनी स्वतःच्या शेतातचं राख टाकून आंब्याची झाडे लावून संगोपन करण्याचा निर्णय केला.एवढेच नव्हे तर गावातील 11 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपये बॅंकेत ठेव पावती करण्याचाही निर्णय केला आहे. धार्मिक रूढीला बळी न पडता मायकर परिवाराने परिसरातील शेतकरी कुटुंबासमोर नवीन पायंडा पाडला आहे.
12 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध लेखिका प्रा.शैलजा बरुरे,अंबाजोगाई जि.बीड यांचे 'इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येवू दे!या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सामूहिक भोजनाची व्यवस्था केली आहे.शेतकरी संघटनेचे सुभाष आबा मायकर, माऊली दादा मायकर आणि कुंडलिक बापू मायकर यांनी आईच्या मृत्यूनंतर घेतलेल्या सामाजिक उपक्रमाची दिंद्रुड पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे.