केज तालुक्यात एक महिन्यात दुसरा बालविवाह ! अल्पवयीन मुलीच्या लग्ना नंतर दुसऱ्या दिवशी आई-वडील, सासू-सासरे आणि नवऱ्यासह सात जणां विरुद्ध गुन्हा दाखल !

सब टायटल: 
नांदण्यास नकार देताच मुलीला अज्ञात स्थळी मुलीला सोडून नातेवाईकांचे पलायन
Crime

 

 

           केज (गौतम बचुटे)-

         दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले. तिने हे लग्न मान्य नाही व नांदणार नाही. असे म्हणताच वडील, आजोबा आणि मामाने तिला एका गाडीत बसवून अज्ञात स्थळी सोडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीचे आई वडील, आजोबा, मामा, सासू सासरे आणि नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            अंबाजोगाई तालुक्यातील एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या इच्छे विरुद्ध दि. १६ फेब्रुवारी रोजी तिच्या मामाच्या गावी मांगवडगाव ता. केज येथील शेतात औरंगाबाद येथील एका तरुणा सोबत लावून दिला. सदर अल्पवयीन मुलगी ही त्या विवाहास तयार नसताना बळजबरीने व धमकी देऊन तिचा विवाह लावून देण्यात आला. त्या नंतर सासू-सासरे आणि नवऱ्या सोबत एका गाडीने घेऊन ते औरंगाबादला घेऊन गेले. औरंगाबादला गेल्यास त्या रात्री अल्पवयीन मुलीने तिला हे लग्न मान्य नसल्याने इथे राहणार नाही; असे सांगीतले. तेव्हा तिला सासरच्या मंडळींनी धमकावले तसेच तिच्या आई-वडिलांना फोन केला आणि हा प्रकार सांगितला.

त्या नंतर दि. १८ फेब्रुवारी रोजी मुलीचे वडील, आजोबा आणि मामा हे स्कॉर्पिओ गाडीने औरंगाबादला गेले. तिथे तिला सर्वांनी मारहाण केली. तिला त्यांच्या सोबत स्कॉर्पिओ गाडीत बसवून एका अज्ञात स्थळी नेऊन सोडून दिले आणि ते सर्व निघून गेले. त्या अल्पवयीन मुलीने एका महिलेला तिची व्यथा सांगितल्या नंतर ती महिला व एक पुरुष यांच्या मदतीने तिने दौलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वा. आई-वडील, आजोबा, मामा, सासू-सासरे, व नवरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा हा युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत मांगवडगाव येथील असल्याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ३६/२०२३ भा. दं. वि. ३२३, ५०४, ३४ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.

एक महिन्यातील दुसरी घटना !

       या पूर्वी दि. २८ जानेवारी रोजी असाच एक अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. म्हणून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आई-वडील, मामा-मामी, सासू-सासरे, दीर-जाऊ, नवरा आणि मेव्हणा या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
 

शहरी भागातील नवरदेव आणि नातेवाईक बालविवाहाला संमती कशी देतात :-* ऊस तोड होत असलेल्या आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या भागात बालविवाह होतात परंतु औरंगाबाद सारख्या शहरातील नातेवाईकही कसे काय संमती देतात हे विशेष !
 

बालविवाह आणि शिक्षा :

मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे वय २१ वर्ष या पेक्षा कमी वयात त्यांचे लग्न केल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार लग्न लावून देणारे; यांना दोन वर्षांचा कारावास आणि एक लाख रु दंड अशी या कायद्यात तरतूद आहे.
 

मुलींचे प्रमाण कमी असल्याने बालविवाह होत आहेत. मुलींचे पालक हे जावयाच्या बाबतीत सरकारी नौकरी, घर, गाडी, जमीन, सोने, बँक बॅलेन्स अशा अपेक्षा असल्याने बालविवाहाचे ते देखील एक कारण आहे.