स्व विलासराव देशमुख सभागृहातील खुर्च्या, कुतुहल अन् प्रश्न...

Rajkiya

 

              शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक नगरीसोबत अंबाजोगाई ही आणखी कशा-कशाची नगरी आहे ? याबाबत मतभिन्नता असण्याचे कारण नाही. पुणेरी इरसाल माणसं अन् अंबाजोगाईकर प्रेक्षक यांत फारसा फरक नाही. इथले प्रेक्षक कमालीचे चोखंदळ (?) असल्याने मुकुंदराज सभागृहातील खुर्च्या रिकम्या राहण्याची शक्यता पाहता छोटेखानी उत्सवासाठी विलासराव देशमुख सभागृहाची निर्मिती करण्यात आली. मर्यादित उपक्रमांसाठी हे सभागृह अतिशय उपयुक्त आहे, म्हणुन इथे वर्षाकाठी कित्येक समारंभ यशस्वी होतात. या महिन्यात मुकनायक दिन व कै.त्र्यंबक असरडोहकर पत्रकारिता पुरस्कार अशा दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं भाग्य मिळाले. या सभागृहातील कार्यक्रमांना उपस्थित नामांकित, दिग्गज, प्रतिष्ठीत व वजनदार (?) मान्यवर बसण्यासाठी व्यवस्थित, चांगल्या व साथ देणाऱ्या खुर्च्या शोधतात याचे कुतुहल वाटले आणि किमान पंचवीस टक्के खराब झालेल्या म्हणजे माना टाकलेल्या किंवा झुलत्या खुर्च्या दुरुस्त का केल्या जात नाहीत, हा यक्षाला सुध्दा पडलेला अनाकलनीय प्रश्न आहे. अर्थात कितीही मान्यवर असला तरी त्याची चांगली खुर्ची शोधतानाची तारांबळ पाहण्याची मज्जा अंबाजोगाईकर घेत असावेत. तसं तर "अंबानगरीत प्रत्येकाच्या अनेकार्थाने खुर्च्या फिक्स असल्या" तरी अतिशय आटोपशिर व सुंदर कार्यक्रम संपन्न होणाऱ्या या सभागृहातील खुर्च्यांच्या डागडुजीसोबत इतर सुविधांचे पुनर्रनिर्माण करायला अत्यल्प निधी लागेल असे वाटते. सभागृहात मित्र, स्नेही किंवा सोबत्यांसोबत एकत्र आलेल्यांना अशा कचखाऊ खुर्च्यांमुळे "अंतर सोडुन" बसावे लागते. असे कोणतेच "अंतर" अंबाजोगाईकर पडु देत नाहीत, हा इतिहास आहे. 

                   आपला 
                   दि.ना.फड