सरकारी डॉक्टरच्या हातावर चोरट्यानी दिल्या तुरी !

गौतम बचुटे/केज :- अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात सेवा करणाऱ्या एका डॉक्टरांच्या शेतातील तुरीचे चौदा कट्टे चोरीला गेले आहेत.
होळ ता. केज येथील रहिवाशी असलेले डॉ. अशोक तुकाराम घुगे हे २००१ पासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतिर्थ अंबाजोगाई येथे वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांची होळ व दिपेवडगाव शिवारात शेती आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी दिपेवडगाव शिवारातील गट नं. ६/३/१ मध्ये अंबाजोगाई ते केज जाणारे रोड लगत असलेले शेतामध्ये दुपारी २:०० वा. सुमारास सालगडी नानासाहेब शंकर पवार याने तुरीचे खळे केले. १४ कट्टे तुर झाली होती. रात्री सालगडी नानासाहेब शंकर पवार हा तुरीचे खळ्यावर झोपला होता. दि. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:०० वा. डॉ. अशोक घुगे हे दुध आणणेसाठी शेतात गेले असता; माझे शेतातील गडी खळ्यावर झोपलेला मिळुन आला. परंतु तुरीचे कट्टे दिसले नाहीत. याची त्यांनी सालगड्याकडे चौकशी केली. परंतु या चोरीची त्यालाही कल्पना नाही. तसेच नंतर सालगडीही निघून गेला.
या बाबत डॉ. अशोक घुगे यांनी दि. १४ फेब्रुवारी रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध ४२ हजार रु. ची १४ कट्टे तूर गु. र. न. २७/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे हे पुढील तपास करीत आहेत.