शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचा अंबाजोगाईत सन्मान सोहळा

Rajkiya

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
भारतीय किसान संघ-परिसंघ अर्थात सिफा या देश पातळीवर काम करणाऱ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून रघुनाथदादा पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे. यानिमित्ताने अंबाजोगाई जि.बीड येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या हस्ते सन्मान सोहळा आयोजित केला आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शेतकरी संघटनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष लखन होके यांनी दिली.

      शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी दिलेले 'कर,कर्जा नही देंगे',बिजली का बील भी नहीं देंगे!हे आंदोलन रघुनाथदादा पाटील यांनी महाराष्ट्रभर आक्रमकपणे राबविले.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ऊसाला प्रतिटन 850/- रुपये पेक्षा अधिक भाव देणाऱ्या साखर कारखान्यावर
फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने केला. तेव्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करण्याचे जाहीर आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले होते. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. दिग्विजय खानविलकर,पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांच्या घरावर दगडफेक करून साखर सम्राटांवर जरब बसवली.याची दखल घेऊन शरद जोशी यांनी त्यांना ऊस आंदोलनाचे सरसेनापती केले. 
रघुनाथदादा पाटील यांचे वडील रामचंद्र ऊर्फ आप्पा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी होते. धुळ्याच्या खजिना लुटीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भूमिगत असतानाच गोऱ्या इंग्रजांनी देश सोडला अशी लढाईची पार्श्वभूमी असलेल्या रघुनाथदादा पाटील यांचा अंबाजोगाई येथे सन्मान होत आहे.

       शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून सिलींग,आवश्यक वस्तू आदीसह गळफास ठरलेले राज्य घटनेच्या नवव्या परिशिष्टातील सुमारे 284 कायदे  रद्द करुन शेतकऱ्यांना गुलामीतून मुक्त करावे यासाठी जीवाचे रान करणारे किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या शुभहस्ते रघुनाथदादा पाटील यांचा सन्मान होणार आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, युवा आघाडीचे रामेश्वर गाडे, ऊस तोडणी कामगार शेतकरी संघटनेचे आनंद भालेकर, महिला आघाडीच्या विमलताई आकनगिरे आदी पदाधिकारी सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, अनुरथ काशिद आणि अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष लखन होके यांनी केले आहे.