विनयभंग प्रकरणातील दोषारोप-पत्र २४ तासाच्या आत न्यायालयात दाखल

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई शहर पोलीसांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतल्या नंतर अवघ्या २४ तासात त्याच्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप-पत्र दाखल केल्याने या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील एका भागात ३३ वर्षाच्या आरोपीने वाईट हेतूने महिलेचा पाठलाग करून विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अंबाजोगाई येथील कोष्टी गल्लीत राहत असलेला प्रशांत राजेंद्र मसनाळे याच्यावर गु. र. नं. १३८/२०२५ भा .न्या. सं. ७४, ७८, ३५१(२), ३५१(३) नुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी प्रशांत मसनाळे हा पोलिसांना गुंगारा देवून फरार झाला होता. मात्र तपासी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची गुप्त माहिती काढली. तसेच त्याचे फोन लोकेशन आणि सीडीआर याची सायबर शाखेकडून माहिती घेत त्याला पुणे येथून ताब्यात घेतले.
आरोपी प्रशांत मसनाळे त्याला ताब्यात घेवून चौकशी केल्या नंतर अवघ्या २४ तासात त्याच्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. अवघ्या २४ तासात न्यायालयात आरोप पत्र दाखल केल्याने तपासी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत असून गुन्हेगार मात्र पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे धास्तावले आहेत.