भाविकांना व स्थानिक नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास आराखड्याची रचना पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील

पंढरपूर दि.17(उ.मा.का)- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात.  पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी  वारकरी भाविकांना व स्थानिक नागरिकांना केंद्रविंदू मानून विकास आराखड्याची रचना करण्यात आली असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 
पंढरपूर तीथक्षेत्र विकास आरखड्यासंदर्भांत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वारकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच व्यापार संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, वीर महाराज व स्थानिक व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. 
यावेळी पालकमंत्री  विखे पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारुप आराखडा करताना भविष्यात होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेवून करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत  करण्यात येणारी कामे ही स्थानिक नागरिक व वारकरी, भाविकांच्या  निदर्शनास आणून व विश्वासात घेवूनच करण्यात येणार आहेत.  शहरात एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पंढरपूर शहरालगताच्या परिसराचाही विकास करुन त्या ठिकाणी भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  वारकरी सांप्रदायाच्या परंपरेला व संस्कृतीला धक्का न  पोहचता विकास कामे करण्यात येणार आहेत. शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर सौंदर्यीकरण करण्याबाबत या आराखड्यात विचार करण्यात येणार आहे असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
तसेच  स्थानिक व्यापारी, नागरिक व वारकरी यांनीही विकास आराखडा  15 दिवसांत  प्रशासनाकडे सादर करावा. प्रशासनाने तयार केलेला आराखडा आणि व्यापारी व स्थानिक नागरिकांनी केलेला आराखड्याबाबत एकत्रित विचार करुन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.  कॉरिडॉरबाबत व्यापारी व नागरिकांनी भीती बाळगू नये. नागरिाक व व्यापारी यांचा भविष्याचा विचार करुनच जास्ती-जास्त मोबदला देण्यात येईल असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी  यावेळी सांगितले.
यावेळी स्थानिक व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नागरिक यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार व्हावा असे सांगितले.