खरीप 2023 मधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालांची फेर तपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडे यांचे विमा कंपनीला निर्देश

.
धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
मुंबई (प्रतिनिधी) -
भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना अंतिम कापणी अहवालामध्ये अपात्र ठरवले असून त्यासाठी कारणेही आवश्यक आहे. मात्र काही केसेस मध्ये तेही आढळत नाही, त्यामुळे विमा कंपनीने कोणतेही आडेवेडे न घेता, तात्काळ सदरील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान अहवालांची फेर तपासणी करून या शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याचे निर्देश कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले आहेत.
या बैठकीस धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विमा कंपनीचे क्षेत्रव्यवस्थापक एम ए सावंत तसेच उपप्रबंधक सचिन पाटील यांचा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी धनंजय मुंडे यांची ही सूचना मान्य केल्याचे सांगितले.
याशिवाय रब्बी 2023 मधील प्रलंबित असलेले दोन कोटी रुपये तत्काळ वितरित करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले असून येथे आठ दिवसात त्या पैशांचे वितरण केले जाईल असे विमा कंपनीच्या वतीने श्री सावंत यांनी सांगितले.
चालू खरीप हंगामात सततच्या पाऊस व अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी दाखल बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम मिळऊन देण्यासाठी रँडम सर्व्हे याच आठवड्यात पूर्ण करावेत आणि त्यांना 25% अग्रीम पिक विमा वितरणाची कार्यवाही तातडीने सुरू करावी असेही निर्देश धनंजय मुंडे यांनी या बैठकीत दिले आहेत.