धनंजय मुंडेंची बदनामी करून थोडीफार प्रसिद्धी मिळेल, आमदारकीचे दिवास्वप्न विसरा ॲड.राजेश्वर चव्हाण यांचा पत्रकार परिषद घेणाऱ्या 'त्या' नेत्यांना सल्ला

सब टायटल: 
ट्रॅक्टर-बैलगाड्या भाड्याने मिळतात, त्यात बसवायला माणसे कुठून आणणार? - वाल्मिक अण्णा कराड यांचे विरोधकांना आव्हान
Rajkiya

.

धनंजय मुंडे यांची बदनामी करू पाहणाऱ्या विरोधकांच्या टोळी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद 

             परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - 

       दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचे स्वप्न पाहून गुदगुल्या होत असणाऱ्या काही असंतुष्ट नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. दिवसरात्र शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या सेवेत आणि परळी मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या कुटुंबाच्या सुख दुःखात धनंजय मुंडे सहभागी असतात, मात्र त्यांच्यावर टीका करणारे हे विरोधक मागील 5 वर्ष कुठे होते? इथल्या शेतकरी किंवा सामान्य नागरिकांवर कोणतेही संकट आले तिथे धनंजय मुंडे व त्यांचे सहकारी छातीचा कोट करून त्या संकटाला सामोरे जातात, तेव्हा हे विरोधक कुठे होते? कुठेही जनतेच्या कामात आणि मनात नसणाऱ्या आणि केवळ बदनामीचे उद्दीष्ट ठेवत पत्रकार परिषद घेणाऱ्या ह्या नेत्यांनी आमदारकीचे दिवास्वप्न विसरून जावे, असा सल्ला आज परळी येथील जगमित्र कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी दिला आहे. 

        एक रुपयात शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतवरून त्यांना तो मिळवून देण्यासाठी प्रसंगी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका धनंजय मुंडे घेत आले आहेत. त्यामुळेच कोट्यावधी रुपये विमा आणि अनुदान शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित देखील मिळण्याचा मार्ग धनंजय मुंडे यांनी मोकळा करून दिला आहे. त्या सर्वांची यादीच देतो, मात्र त्यासाठी चर्चेला या, भुस्कटात गोळ्या घालून केवळ धुरळा उठवण्यापेक्षा चर्चेतून उत्तर द्या, खोटे आणि अर्धवट माहितीवर आरोप करणे सोडून वस्तुस्थिती स्वीकारा, असाही सल्ला ऍड.चव्हाण यांनी दिला आहे. 

          काही विरोधक स्वतःला शेतकरी नेते समजून येत्या 23 तारखेला बैलगाड्या व ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढाल त्यासाठी बैलगाड्या ट्रॅक्टर भाड्याने मिळतील मात्र त्यामध्ये बसवण्यासाठी माणसे आणि खरे शेतकरी कुठून आणणार आहात तेवढे लोक तरी तुमच्या पाठीशी आहेत का ? अशीही मिस्कील टिप्पणी ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांनी केली असून, आम्हीसुद्धा वेगवेगळ्या योजनांचा विम्याचा आधी लाभ मिळालेले शेतकरी गावाच्या व नावाच्या सहित आणून दाखवतो असे आव्हान वाल्मिक अण्णा कराड यांनी विरोधकांना दिले आहे. 

            राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही तथाकथित व मागील पाच वर्षात किमान चार वेळा आपले पक्ष बदललेल्या नेत्यांनी मिळून पत्रकार परिषदेत घेऊन निराधार आरोप केले होते. त्यावर आज धनंजय मुंडे यांच्या परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण यांच्या नेतृत्वात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चोख प्रतिउत्तर देण्यात आले. 

          2023 सालच्या उर्वरित पीक विम्याच्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी आजच सुट्टीच्या दिवशी सुद्धा पिक विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन निर्णय घेतला असून कोणतेही कारण न दाखवता पात्र करण्यात आलेल्या सुमारे अडीच ते तीन लाख शेतकऱ्यांना अंतिम कापणी अहवाला नंतरचा पिक विमा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसलेले विरोधक अपात्र शेतकऱ्यांची यादी घोषित करा असे म्हणतात, परंतु अपात्र शेतकऱ्यांची यादी घोषित केल्याने विमा कंपनी पुन्हा या शेतकऱ्यांना विमा देण्यास बांधील राहणार नाही याचे भान किंवा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीशी या विरोधकांना कोणतेही देणे घेणे नाही असाही आरोपी यावेळी राजेश्वर चव्हाण यांनी केला. 

                 यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देत असताना सदर नेते हे वेगवेगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून धनंजय मुंडेंची त्यांच्या माध्यमातून बदनामी करण्याची घेतलेली सुपारी वाजवण्याचे काम करत आहेत मात्र या लोकांची निष्ठा नेमकी कुणासाठी आहे हे त्यांनी सिद्ध करावे असा टोला माजी सभापती ॲड. गोविंदराव फड यांनी लगावला. 

            कोविडच्या लॉकडाऊन च्या काळामध्ये 25 आरोग्य केंद्र व कोविड सेंटर या ठिकाणी जीवन नाश्त्यापासून औषधे तसेच मोफत मिळवून देण्यासाठी अहोरात्र धनंजय मुंडे व त्यांचे सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला लॉकडाऊन काळात विकता आला नाही तर तो विकत घेऊन लोकांना मोफत वाटण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले. त्या काळात या पोपटपंची बोलणाऱ्या विरोधकांपैकी कोणीतरी लोकांच्या सेवेत होते का असाही सवाल ॲड. गोविंदराव फड यांनी उपस्थित केला. 

     गोरगरीब कुटुंबातील 2200 बहिणींचे कन्यादान करण्याचे पुण्य मिळवणारे धनंजय मुंडे यांना कोविड काळात सामुदायिक विवाह सोहळा घेता आला नाही तर लग्नास पात्र असलेल्या गोरगरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी त्यांनी रोखीने मदत दिली. आणि अशा नेत्यावर चहा पाजण्याची ही दानत नसणारे किंवा आपल्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा मदत करण्याची पात्रता नसणारे लहान मोठे नेते आरोप करतात त्यांची क्यू येते असे वक्तव्य ज्येष्ठ नेते माऊली तात्या गडदे यांनी केले आहे. 

        वैद्यनाथ मंदिर समितीच्या विश्वस्त समितीतील एक नेता विधानसभेच्या दृष्टीने काही मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असून त्यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करणे हास्यास्पद आहे वैद्यनाथ मंदिर विश्वस्त समितीमध्ये त्यांनी चालवलेला अंदाज धुंद भ्रष्टाचाराचा कारभार आपण पुराव्यासहित उघड करणार असून याबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी म्हटले आहे. 

               या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, ऍड गोविंदराव फड, दीपक नाना देशमुख, माऊली तात्या गडदे, लक्ष्मण तात्या पोळ, मोहनराव सोळंके, सुनील नाना फड, राजाभाऊ पौळ, यांसह पदाधिकारी उपस्थित होते.