नाकापेक्षा मोती जड झालेल्या तहसील कार्यालयातील कोतवालांना तलाठी सज्जावर पाठवा



.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई तहसील कार्यालयाशी सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन कामाशी दररोज संबंध येतो मात्र तहसील कार्यालयामध्ये शासनाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या टेबलावर कोतवाल बसून जनतेची अडवणूक करत आहेत त्यामुळे नाकापेक्षा मोती जड झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ जागी तलाठी सज्जावर तात्काळ पाठवावे यासह इतरही मागण्याचे निवेदन अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष महादू मस्के यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केली आहे
विभागीय आयुक्त, बीडचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सुरुवातीला कोतवालांची कर्तव्य काय आहेत हा मजकूर नमूद करण्यात आला आहे त्यानंतर अंबाजोगाईचे तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अव्वल कारकून नेमून दिलेल्या पदावर काम करण्यास सक्षम असताना तहसील कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख यांनी कोतवालांना महसूल सहाय्यक, अव्वल कारकुणाच्या पदावर काम करण्यासाठी आदेशित केले आहे गेली अनेक वर्षापासून तहसील कार्यालयातील कारकुणाच्या जागी कोतवाल बेकायदेशीरपणे राजरोस काम करत आहेत कारकुणाच्या नावाने लोकांकडून पैसे उकळले जात आहेत तसेच वरिष्ठांचे आदेश न मानने, कारकून यांना डावलून परस्पर तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या फाईलवर आणून जनतेची आर्थिक पिळवणूक करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक साधून विविध मार्गाने आर्थिक हितसंबंध निर्माण करणे त्याचा गैरफायदा घेऊन कार्यालयातील इतर वरिष्ठ कर्मचारी यांचे आदेश न पाळणे असे प्रकार गेले अनेक वर्षापासून अंबाजोगाई तहसील कार्यालयात सुरू असल्याचा गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे
जनतेतून या संदर्भात अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी कडे येत आहेत त्यामुळे कोतवाल यांना तात्काळ आपआपल्या तलाठी सज्जावर त्यांना पाठवावे अशीही मागणी शेवटी करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली त्यात म्हटले आहे की कोतवाल यांना सज्जावर पाठवण्याचे आदेश द्यावेत तशा सूचना अनेक वेळा दिलेल्या आहेत मात्र अधिकाऱ्यांनी कोतवालांना डोक्यावर घेतल्याने ते कोणालाही जुमानत नाहीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा, निवडणूक शाखा, संजय गांधी शाखा ,आस्थापना अशा विविध शाखा मधील लिपिकांच्या टेबलावर कोतवाल काबीज झाले आहेत सर्वांना तलाठी सज्जावर पाठवून जनतेची होणारी आर्थिक मानसिक पिळवणूक थांबवावी अशी ही शेवटी विनंती करण्यात आली आहे या सोबतच इतर मागण्याही निवेदनात केल्या त्या पुढील प्रमाणे आहेत
1) तहसील कार्यालयातील बरेच कर्मचारी सकाळी कार्यालयात उशिरा येतात
2) जन्म ,मृत्यू नोंद प्रमाणपत्राचे काम संबंधित महसूल सहाय्यक हे पहात नसून कोतवालाच्या मनावर कामकाज चालते
3) संगायो,श्रावण बाळ सह विविध योजनेचे अर्ज व शपथपत्रावर अव्वल कारकून शपथपत्र प्रमाणे करून देत नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे
4) तहसील कार्यालयातील इमारतीत व परिसरातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे
5) गुंठेवारीचे प्रकरणे अनेक प्रलंबित आहेत ती सुरू करावी
6) अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत
7) ग्रामीण भागातील सीएससी सेंटर शहरात अनाधिकृतपणे सुरू आहे त्याची चौकशी करावी
8) अंबाजोगाई तहसील कार्यालय व परिसरात बरेच एजंट असून त्यांच्यावर कार्यवाही करावी
9) अंबाजोगाई तलाठी सज्जाचे तलाठी हे तलाठी सज्जावर कधीच हजर राहत नाहीत
10) अंबाजोगाईचे मंडळ अधिकारी जनतेच्या कामात सतत अडवणूक करत असतात
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष महादू मस्के, बळीराम चोपणे, वहीद सिद्दिकी ,प्रशांत आदनाक, कल्याण काळे , सचिन केंद्रे ,संजय वाघमारे, नाना गायकवाड, शिरीष मुकडे, अक्षय भुमकर, माऊली वैद्य यांच्यासह अनेक भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपजिल्हाधिकारी ,तहसीलदार या संदर्भात काय भूमिका घेतात येणाऱ्या काळात लक्षात येईल मात्र अधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागेल असे दिसते