चनई तांड्याची जिल्हा परिषदेची शाळा भरते लहू आडे यांच्या राहत्या घरात

सब टायटल: 
तांड्याची शाळा सुरू झाल्यापासून शाळेला खोली मिळालीच नाही
Arogya Shikshan

.

            अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

बीड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांना सध्या ओस पडू लागल्या आहेत अनेक गावच्या शाळेच्या परिसरात पाय ठेवायला जागा नाही एवढ्या शाळा खोल्या बांधल्या जात आहेत मात्र अंबाजोगाई तालुक्यातील चनई गावच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चनई तांडा या गावची पहिली ते पाचवी वर्गापर्यंतची शाळेला सुरू झाल्यापासून आज पावतो खोलीच नसल्याने लहू आडे नामक नागरिकांच्या राहत्या घरात सध्या जिल्हा परिषदेची शाळा भरत असल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे 

          चनई तांडाची लोकवस्ती 100 च्या आत ना बाहेर असून पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत अगोदर हा तांडा नदीच्या खोऱ्यात होता मात्र कालांतराने पुन्हा रस्त्याच्या कडेला घरे करून लोक राहतात विशेष म्हणजे चनई गावच्या मतदार यादीत या तांड्यावरील नागरिकांची नावे आहेत त्यामुळे स्वतंत्र या गावाला दर्जा नाही किंवा वस्तीला दर्जा नाही एकीकडे चनई गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरात पाय ठेवायला जागा नाही एवढ्या शाळा खोल्याचे बांधकाम झाले आहे मग प्रश्न निर्माण होतो चनई तांडा चनई ग्रामपंचायतचा भाग असताना आज पावेतो चनई तांड्याच्या शाळेला साधी शाळा खोली का मिळाली नाही चनई जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर अण्णा उबाळे यांच्या नुसार चनई तांड्यासाठी त्यांनी त्यांच्या काळामध्ये शाळा खोली मंजूर केली होती मात्र जागा उपलब्ध न झाल्याने शाळा खोली बांधता आली नाही, चनई गावचे सरपंच दीपक शिंदे आहेत ग्रामपंचायत कडून  शाळा खोली न मिळण्या मागची भूमिका काय हे मात्र कळू शकलेले नाही 

      राहत्या घरात भरते शाळा 

             चनई गावापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर असणारा तांडा आहे शाळा खोली नसल्याने शाळा कायम एका झाडाखाली भरत होती मात्र मुला मुलींना पाऊस आल्यानंतर बसता येत नव्हते त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले लहू आडे नामक नागरिकांनी शाळेतील शिक्षक वैरागे व जाधव यांना विनंती केली की शाळा माझ्या राहत्या घरात भरवा आम्ही शेतात कामाला दिवसभर जातो संध्याकाळी आम्ही आमच्या घरात राहू मात्र दिवसभर तुम्ही शाळा आमच्या घरात भरवण्यास आमची हरकत नाही त्या दिवसापासून चनई तांडाची शाळा लहू आडे यांच्या घरात भरते 

       खरे तर शाळेसाठी आपले राहते घर उपलब्ध करून देणाऱ्या लहू अडेचा सार्वत्रिक सत्कार व्हायला हवा शाळेची अवस्था पाहिली तर पुढारी प्रशासकीय अधिकारी नागरिकांची शरमेने मान नक्की खाली जाईल मात्र आज पावेतो या शाळेला शिक्षण खात्याच्या ना अधिकाऱ्यांनी ना पुढाऱ्यांनी कोणीही भेट दिली नाही त्यामुळे कोणाचीही मान शरमेने खाली जाण्याचा प्रश्नच आला नाही 

         रोटरी सारख्या सेवाभावी संस्था अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ सारख्या पोलीस चौकीच्या नूतनीकरण करण्यासाठी हजारो रुपये खर्चूनही ती पोलीस चौकी आजही बंदच असते चनई तांडा येथील शाळा तर सुरू आहे अशा ठिकाणी रोटरीच्या सदस्यांची नजर का पडत नाही अशी चर्चा होत आहे दुसरे विशेष म्हणजे बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड यांनी अंबाजोगाई येथील काही कार्यकर्त्यांना करोडो रुपयाची गुत्तेदारीची कामे दिल्याचे समजते मात्र तांड्यावरील मुलांना बसण्यासाठी शाळा खोली देऊ शकले नाहीत करोडोची गुत्तेदारी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी पुढाकार घेऊन चनई तांडा येथे विद्यार्थ्यांना किमान पत्र्याचे शेड टाकून सहारा द्यावा अशी ही नागरिकांतून मागणी होत आहे