सजग आशा सेविकेमुळे माता व बाळ सुखरूप

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत माता-बाल मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आशा सेविका देशातील गावागावांत सेवा देत आहेत. शासनाच्या आरोग्यासंबंधी योजनांना घरोघर पोहचविण्याचे कार्य त्या पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, माता-बाल मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आशा सेविकांची उत्कृष्ट कामगिरी असल्याचे आपण अनेक वेळा अनुभवले आहे. याचाच प्रत्यय काल रात्री अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील गरोदर मातेच्या बाबत आला.
तालुक्यातील येल्डा गावातील गरोदर माता जिल्हा अचानक रात्री हृदयविकाराचा झटका आला.ती माता आठ महिन्याची गरोदर होती. रात्री लाईट नाही, आभाळ दाटून आलेले होते. अशा परिस्थितीमध्ये गरोदर मातेला हृदयविकाराचा झटका आला.ही माहिती या गावच्या आशा सेविका शीला गायकवाड यांना समजली.त्यांनी क्षणाचाही वेळ न घालवता लगेच नातेवाईकांना सोबत घेऊन सदरील मातेला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तुती विभागात दाखल केले येथे दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता तात्काळ शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. बाळ व मातेला सुखरूप या प्रसंगातून बाहेर काढले.त्याबद्दल आशा सेविका यांनी बोलताना सांगितले की तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बाबासाहेब लोमटे व तालुका समन्वयक काझी मॅडम यांनी घेतलेल्या वेळोवेळी प्रशिक्षणाचा या ठिकाणी उपयोग झाला. भविष्यामध्ये असा प्रसंग कोणावर येऊ नये,मात्र जरी कोणावर वेळ आली तर वेळेवर उपचार मिळाला की अनुचित घटना टाळू शकतो. आशा सेविका यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल व डॉक्टरांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता केलेल्या उपचाराबद्दल सर्व स्थानातून कौतुक होत आहे.