शरणागत महाराष्ट्र काँग्रेस

.
१९९० सालापासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून (तन,मन,धनाने) काम करत होतो. युवक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस ए.आय.सी.सी. अशा विविध स्तरावर मी संघटनेत कार्यरत होतो. या काळात स्व. शिवाजीराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, प्रतापराव भोसले स्व. गोविंदराव आदिक स्व.प्रभाताई राव, माणिकराव ठाकरे, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या प्रदेशाध्यक्षांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली.
मागील तीस वर्ष काँग्रेस संघटनेत काम करत असताना अनेक वेळा काँग्रेसला राष्ट्रवादी काॅन्ग्रेस सोबत आघाडी करावी लागली. मात्र अशा प्रकारची आघाडी करताना त्या त्या वेळच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही,याची काळजी घेतलेली होती.सध्या महाविकास आघाडी या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन पक्षांची आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोघांकडेही ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कणखर व आपल्या पक्षाची बाजू आग्रहाने मांडणारे नेतृत्व आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी पवार आणि ठाकरे यांच्यासमोर शरणागत झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातील काही नेते तर पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या सल्ल्यानेच काम करतात, असा अनेक वेळा उघड आरोप देखील झालेला आहे.
नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हाती घेतल्यानंतर काँग्रेसला एक ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याचा माझ्यासह सर्वांना आनंद झाला होता.मात्र मागील दोन वर्षात स्थानिक पातळीवरील काँग्रेस अंतर्गत वस्तुस्थितीचा राजकारणाचा आढावा घेण्यात आणि त्यावर उपाययोजना करण्यात आलेले अपयश, राज्यस्तरावरील नेत्यांमधील समन्वयाचा अभाव, प्रदेशाक्षांभोवती निर्माण झालेली चौकडी, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांना विश्वासात न घेता परस्पर घेतले जाणारे निर्णय, यामुळे तालुका स्तरापासुन राज्यस्तरावर निर्माण झालेला असंतोष यामुळे प्रदेश काँग्रेस "टिम" म्हणून काम करण्यात फारशी यशस्वी झाली नाही.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहा कार्याध्यक्ष, अनेक उपाध्यक्ष शेकडो सरचिटणीस अशी जंबो कार्यकारिणी असताना देखील मागील काही महिन्यांपासून "टिळक भवनात" शुकशुकाट जाणवत होता. हे कशाचे लक्षण ?.
प्रदेश काँग्रेस नेतृत्व कार्यकर्त्यांना विश्वास देऊ शकले नाही, असेच म्हणावे लागेल. संघटनेत आपले म्हणणे कुणीच एकुण घेत नाही, अशी भावना सर्व स्तरांवर निर्माण झाली. त्यामुळेच अगदी गावपातळीपासुन राज्यस्तरीय मोठ्या नेत्यांनी पक्षापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. मी देखील काँग्रेस मधील माझ्या ३५ वर्षांच्या प्रवासाला त्यामुळे विराम दिला.
लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे जागावाटप झाले, त्याबद्दल गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या मनात निराशेची भावना आहे.* *पाच वर्षे पक्षाच्या आदेशानुसार काम करायचे आणि ऐन निवडणुकीच्या परीक्षेला बसण्याची त्यांची संधी हिरावून घ्यायची , हे अत्यंत दुर्देवी आहे.
सांगली,भिवंडीची जागा, मुंबई मधील जागा याबाबत झालेले जागावाटप यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.याशिवाय असे अनेक जिल्हे आहेत की त्याठिकाणी जागावाटपात किमान एकतरी जागा मिळविण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. उदाहरणार्थ उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर त्यात पाच जिल्ह्यांचा (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार) समावेश होतो.मात्र त्यापैकी नाशिक, जळगाव व अहमदनगर या जिल्ह्यातील सहा जागांपैकी काँग्रेस नेतृत्व एकही जागा (किमान लढविण्यासाठी) मिळवु शकली नाही. ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब आहे. वाटाघाटीचे नेतृत्व करणारी नेते मंडळी राष्ट्रवादी काॅन्ग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासमोर एवढी शरणागत का झाली ? ,असा प्रश्न काॅन्ग्रेस कार्यकर्ते व हितचिंतकांना पडला आहे.