आडस प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा

.
केज (प्रतिनिधी )-
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केज प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जावाढ करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
आडस ही केज तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असून उच्च दर्जाच्या शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आजूबाजूची वीस पेक्षाही अधिक खेडी या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने येथे वर्दळ असते. त्यासोबतच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. आडस परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र त्या प्रमाणात तिथे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नव्हत्या. आजारी व अपघातग्रस्त व्यक्तींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जावे लागते. हे अंतर दूरवर असल्यामुळे अनेक रुग्णांनी वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमावलेले आहेत. त्यामुळे या भागासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती. हि बाब लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी मागील चार वर्षापासून आडस प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी राज्य शासनाकडे करून त्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जावाढ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या ठिकाणी आता तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय होणार आहे. त्यामुळे आडस आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाला चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
बनसारोळा, विडासाठीही प्रयत्न सुरु
आडस सोबतच बनसारोळा आणि विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्जावाढीसाठी आ. नमिता मुंदडा यांचे चार वर्षापासून शासन दरबारी प्रयत्न सुरु असून अनेकदा पत्रव्यवहार झाले आहेत. त्यापैकी सध्या आडस केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यात यश आले असून नजीकच्या काळात लवकरच बनसारोळा आणि विडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होईल, त्यासाठी जोमाने प्रयत्न सुरु आहेत असे आ. नमिता मुंदडा यांनी आश्वस्त केले आहे.