बुट्टेनाथ साठवण तलावाच्या अंबाजोगाईकरांच्या आशा पल्लवित आ. मुंदडांचे प्रयत्न : अंबाजोगाई तालुक्यातील पाच साठवण तलावांसाठी गोदावरी खोऱ्यातून पाण्याचे नियोजन प्रस्तावित

सब टायटल: 
केज मतदारसंघात नवीन ११ बंधाऱ्यांच्या कामासाठी साडेआठ कोटींचा निधी मंजूर
Rajkiya

.

                        अंबाजोगाई - (प्रतिनिधी )-

अंबाजोगाईलगत बुट्टेनाथ परिसरात साठवण तलावाची निर्मिती करण्याची अंबाजोगाईकरांची मागील चाळीस वर्षापासून जिव्हाळ्याची आणि योग्य मागणी पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आ. नमिता मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील बुट्टेनाथ, कुरणवाडी, राक्षसवाडी, चिचखंडी आणि मांडवा तांडा या पाच साठवण तलावांसाठी गोदावरी खोऱ्यातून पाण्याचे नियोजन प्रस्तावित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सद्यस्थितीत अंबाजोगाईची पाण्याची मदार धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यातच मांजरा प्रकल्पावर लातूर शहराचीही भिस्त असल्याने पाणी वाटपात अंबाजोगाईवर होऊन होऊन अनेकदा नागारीकांना निर्जळीचा सामना करावा लागतो. यामुळे अंबाजोगाई परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी बुट्टेनाथ परिसरात साठवण तलावाची नर्मिती करावी अशी मागणी मागील अनेक दशकांपासून केली जात आहे. परंतु, मांजराच्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्याने बुट्टेनाथ प्रकल्पाबाबत पुढे काहीच हालचाल होत नव्हती. याला पर्याय म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बुट्टेनाथसह पाच साठवण तलावासाठी गोदावरी खोऱ्यातून पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. त्यास यश आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बुट्टेनाथ साठवण तलाव (२० दलघमी), कुरणवाडी साठवण तलाव (१.६० दलघमी), राक्षसवाडी साठवण तलाव (२.५० दलघमी), चिचखंडी साठवण तलाव (१.५० दलघमी) आणि मांडवा तांडा (१ दलघमी) हे पाच साठवण तलावासाठी  मध्य गोदावरी खोर्‍यातील अतिरिक्त १९.२९ अब्ज घनफूट पाण्याच्या नियोजनात प्रस्तावित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. नमिता मुंदडा यांना पत्राद्वारे कळविली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या मान्यतेनंतर महामंडळ स्तरावर याबाबत पुढील कार्यवाही होईल असे देखील सदर पत्रामध्ये नमूद आहे. यामुळे बुट्टेनाथसह पाच तलावांच्या निर्मिती प्रक्रियेस चालना मिळणार असून याबद्दल नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने अनेक दशकांच्या मागणीची सकारात्मक दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
-------------------
केज मतदारसंघात नवीन ११ बंधाऱ्यांच्या कामासाठी साडेआठ कोटींचा निधी मंजूर

आ. नमिता मुंदडा यांची माहिती

अंबाजोगाई - अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील ११ साठवण बंधाऱ्यांच्या कामासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून ८ कोटी ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर विकास कामे तातडीने सुरू करण्यात येतील अशी माहिती केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दिली.

घटलेले पर्जन्यमान, सिंचनासाठी वाढलेला पाण्याचा वापर यामुळे भुजल पातळीत लक्षणीय घट होत आहे. भूजल पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई आणि केज तालुक्यात विविध ठिकाणी साठवण बंधारे बांधण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांचे शासन पातळीवर सतत प्रयत्न सुरु आहेत. आ. मुंदडा यांच्या मागणीला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून अंबाजोगाई आणि केज तालुक्यात ११ नवीन बंधाऱ्यांच्या कामासाठी ८ कोटी ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून अंबाजोगाई तालुक्यातील भावठाना, चिचखंडी आणि पाटोदा म. या तीन ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे तर केज तालुक्यातील उंदरी, केकत सारणी, कळंब अंबा, पिसेगाव, खरमटा, विडा आणि बनसारोळा या सात ठिकाणी सिमेंट नाला बंधारे व नांदूरघाट येथे कोल्हापुरी बंधारा तयार केला जाणार आहे. यामुळे भविष्यात सदरील भागात पाणी साठवण क्षमता वाढणार असून बागायती क्षेत्रातही वाढ होणार आहे. मागणीची दखल घेत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री संजय राठोड, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

साठवण बंधारे बांधण्यात येणारी गावे आणि कंसात मंजूर निधी

                 उंदरी (४९ लाख), केकतसारणी (४९ लाख), कळंबअंबा (४९ लाख), पिसेगाव (५७ लाख), नांदुरघाट (१.३२ कोटी), खरमटा (४६ लाख), विडा (५७ लाख), बन्सारोळा (५० लाख), भावठाणा (१.११ कोटी), चिचखंडी (१.१८ कोटी), पाटोदा म. (१.१५ कोटी)