दिंद्रूड येथे एड्स व गुप्तरोग बाबत कलापथकाचे शाहिरीतुन प्रबोधन



.
दिंद्रूड (प्रतिनिधी)-
एच आय व्हि (एड्स) व गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण - २०२४ कार्यक्रमांतर्गत दिंद्रूड येथे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष बीड च्या अधिपत्याखाली, ग्रामीण रुग्णालय चिंचवण व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दिंद्रुड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दुपारी येथील बसस्थानक परिसरात हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात लोकशाहीर विठ्ठल काटे यांच्या कलापथकाने शाहिरीतुन प्रबोधन केले.
राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम आता पाचव्या टप्प्यात आहे महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेमार्फत एचआयव्ही, एडस नियंत्रण व प्रतिबंधात्मक सेवा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष बीड जिल्हा रुग्णालयामार्फत पुरवल्या जात आहे. बीड जिल्ह्यात याबाबत जनजागृती करण्यासाठी पाच पथके कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. गुप्तरोग व एडस या आजारा बाबत जनसामान्यांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावे व योग्य उपचार घेतल्यास या आजारांपासून संक्रमण होणे कसे टाळले जाईल या हेतूने लोकांचे प्रबोधन करण्यात आले.
दिंद्रुड येथे शनिवारी दुपारी बसस्थानक परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक उपकेंद्र दिंद्रुडच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती काशीद, समुपदेशक प्रसाद ठोसर प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजश्री बावरे यांच्यासह वाल्मिक पाईक,मंदा देशमाने, अतुल चांदमारे उपस्थित होते. या कार्यक्रमास दिंद्रुड व पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाने सामाजिक भान जपत आजार ग्रस्त रुग्णांना धीर द्यावे, चुकीच्या अफवा पसरवू नयेत याबाबत उपस्थितांनी प्रतिज्ञा केली.कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपस्थितांचे आभार पत्रकार संतोष स्वामी यांनी मानले.